Blog 
काळाची गरज - सोलार कूकर - सन्मित्र !

काळाची गरज - सोलार कूकर - सन्मित्र !

२५-३० वर्षापूर्वी ची गोष्ट. लग्न होऊन मी नव्या घरात राहायला आले. बैठ्या घराच्या कॉलनी त पंचवीस एक घरे होती. जाता येता यापैकी एका घराच्या अंगणात एक पेटी सूर्याच्या दिशेने उघडून ठेवलेली दिसे. कुतूहलाने चौकशी केली तेव्हा ती पेटी म्हणजे सूर्यचुल (सोलार कूकर) हे समजले. त्या शेजर्‍यांनी त्याचे उपयोग व कला सांगितल्या व ते ऐकून भारावून गेले आणि ठरवूनच टकले की आता मला पण सोलार कूकर घ्यायचा.

पण तेंव्हा काही सहजी उपलब्ध होत नव्हता. माझी उत्सुकता व कुतूहल पाहून त्या शेजर्‍यांनी त्याचा जुना सोलर कुकर तो मला वापरायला दिला. थोडी डागडुजी करून मी तो वापरायला लागले. त्याचे विविध गुण अनुभवून मी त्याच्या प्रेमातच पडले. काही दिवसांपूर्वी सन्मित्र कंपनी मधून मला एकदाचा माझा स्वतःचा-हक्काचा सन्मित्र सोलार कूकर मिळाला. सन (Sun) आणि मित्रा ही सूर्याचीच नवे! त्याची ऊर्जा वापरुन चालणारा हा सन्मित्र माझा जिवलग मित्रच झालाय. त्या मित्राबद्दलच सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच !

सोलर कुकर (सूर्यचूल) ही एक धातूची पेटी आहे. तिच्या झकणाच्या आतील बाजूस एक आरसा आहे. दुसऱ्या खोलगट भागात काळा ट्रे आणि त्यात तीन चार डबे बसतील एवढी जागा आणि त्यावर काचेचे उघडझाप करता येणारे आवरण असे तिचे साधारण रूप आहे.

झाकणाच्या आरशावर पडणारे सूर्यकिरण दुसऱ्या भागात परावर्तित होतात आणि उष्णता निर्माण करतात. हा सोलर कुकर ठेवण्यासाठी जिथे चार पाच तास किंवा जास्त वेळ ऊन येते अशी कोणतीही जागा चालू शकते. माझ्याकडे अशी जागा असल्यामुळे माझा सन्मित्र अगदी आरामात स्थानापन्न झाला आणि मग सुरू झाला प्रयोगांचा सिलसिला !

कुकर म्हंटले की त्यात डाळ भात होणार हे ठरलेलेच होते पण त्यात डाळ कशी लोण्यासारखी मऊ शिजते आणि चुलीवर शिजवलेल्या सारखी खमंग चवीची होते याचा अनुभव शब्दात न सांगता येणार आहे, जो प्रत्यक्षातच घ्यायला हवा! भातही कसा जसा तुम्हाला आवडतो तसा कमी पाणी घातले तर शीतन शीत मोकळा दुप्पट घातले तर मऊसर आणि अजून जास्त घातले तर गुरगुट्या चॉइस तुमचा!

अजून काय शिजेल गवार, वाल, पापडी, भोपळा, घेवडा, गाजर, बटाटे, रताळी, कांदे, टोमॅटो, आवळे, भाजीपाला, दलिया, कोथिंबीर, किंवा आळुचे रोल सगळे काही शिजवून निघाले. भिजलेला राजमा, छोले, चवळी, इत्यादि कुकरमध्ये शिजवले जाणारे बहुतेक सगळे पदार्थ सोलर कुकर वापरून शिजवता येतात, पण त्यासाठी पाण्याचे प्रमाण फार महत्त्वाचे भाज्यांना एक ते दीड टेबलस्पून आणि कडधान्ये त्याच्या पाव पट पाण्यातशिजतात.

उन्हाची तीव्रता कमी असताना पाणी जास्त झाले तर वेळ जास्त लागतो. ऊन तीव्र असेल तर पाणी थोडे जास्त झाले तरी चालते. प्रत्येक पदार्थाला लागणारा वेळ एक आठवडा भर कुकर वापरला की लक्षात येते.

भाज्यांचा अर्क म्हणजेच व्हेजिटेबल स्टॉक करण्यासाठी सोलर कुकर फार उपयोगी पडते. दिवसभर किंवा चार पाच तास ऊन असेल तर मग मस्त अर्क तयार करता येतो.

तुळस, गवती चहा, मिरे, लवंग, दालचिनी, घालून मस्त चहा पण होतो. केशवर्धक तेल करण्यासाठी तेल आणि हव्या त्या गोष्टी एकत्र करून यात ठेवल्या की एखादा दोन दिवसात तेल तयार!

नारळाच्या वड्या, गाजर हलवा, किंवा आळीव घालून लाडू करण्यासाठी नारळ आणि गूळ एकत्र करून सोलर कुकर मध्ये ठेवले तर सारण तयार. ऊन नसेल तर संध्याकाळी फार तर एक चटका द्यावा लागतो गॅस वापरून. पातेल्यात खाली लागायचे टेन्शन नाही, ऊतू जात नाही, करपत नाही, की हाताला व्यायाम नाही.

कैरीचा कीस आणि साखर छान एकजीव करून ठेवा आणि मुरुंबा म्हणून वापर किंवा तिखट घालून एक दिवसात छुंदा करा तुमची निवड.

सोलर कुकर मध्ये शेंगदाणे छान भाजले जातात हे तुमच्या पैकी किमान काही जणांनी तरी ऐकले असेल, हे खरेच आहे खारे शेंगदाने तर अप्रतिम लागतात.

आता त्यात मी भाजत असलेल्या पदार्थांची यादी बघा धने, जिरे, खोबरे, रवा, पोहे, तृणधान्य, कडधान्य, सर्व धान्यांची पिठे जराही हात न लावता हा सोलर कुकर अगदी एक समान भाजून देतो.

मसाला करण्यासाठी चे कांदे एका ताटलीत घालून ठेवले की 2-4 तासात मस्त भाजले जातात. ढोकळा, केक करताना हा सन्मित्र ओव्हन ची भूमिका लीलया पार पाडतो, आणि आपण बनवत असलेल्या पदार्थांचा सुगंध शेजारांच्या घरपर्यंत जातो.

अलीकडे पावसाचे दिवस सोडले तर लोणी काढण्यासाठी सुद्धा मी सन्मित्रलाच सांगते. ऊन फेब्रुवारी मार्च पासून चांगलेच तापू लागते अशा वेळी डाळ-तांदूळ दोन तासात सुद्धा शिजतात. मग जोडीला भाजलेला साबुदाणा गव्हाचा चीक गाडीच्या पापड याचे मिश्रण आधी गोष्टी यात शिजवल्या तरी चालून जाते. मी मांसाहार करत नसल्यामुळे चिकन-मटण मी शिजवले नाही पण अंडी मात्र दिली या मित्राला बॉईल करायला.

दमलात ना यादी वाचून यात तयार होणाऱ्या बऱ्याच गोष्टींची चव अगदी युनिक असते, दुसरे म्हणजे इंधनाची बचत होते. अगदी फक्त कुकर वरची रोजची पंधरा मिनिटे धरली तरी महिन्याला किमान पाचशे मिनिटाचे गॅसची बचत होते. भाजण्याचे श्रम कमी होतात आणि इंधन जाळून अधिक उष्णता निर्माण करण्याऐवजी उपलब्ध उष्णतेचा वापर करता येतो हे हाही फायदा आहेच. आणि खूप म्हत्वाचे म्हणेजे “ड” जीवनसत्त्व खूप प्रमाणात शरीराला मिळते.

भरपूर सूर्यप्रकाशाचे वरदान लाभलेल्या आपल्या देशात खरं तर हे अतिशय उपयुक्त साधन तसे दुर्लक्षित राहिले आहे असे वाटते. माझी आणि त्याची मात्र चांगलीच गट्टी झाली आहे त्यामुळे त्याच्याकडून काम करून घ्यायच्या बऱ्याच युक्त्या मला सुचत असतात. तो माझा कूकिंग रोबोट च झालाय. सध्या याची आणखी कार्यक्षम कार्यक्षम रूपेही उपलब्ध झाली आहेत फक्त ती जरा जास्त भाव खातात. करतली असणाऱ्या मोबाईल फोन नामक मित्रावर गूगल रुपी महाराजांचा वरदहस्त असेल तर तुम्हाला माझा मित्र आणि त्याचे आधुनिक अवतार लगेच पाहता येतील, आणि माझ्या ह्या गुणी मित्रावर फिदा होऊन तुम्ही सोलर कुकर आणला तर, काही गोष्ट लक्षात ठेवा पाण्याचे योग्य प्रमाण आणि पदार्थ तयार होण्यासाठी लागणारा वेळ याचा अंदाज यायला 4-5 दिवसाचा वेळ लागेल. तेवढा धीर ठेवा

हिवाळ्यात चार गोष्टी एकदम ठेवणार असाल तर शिजवण्यासाठी गरम पाणी घाला कारण तेव्हा उन्हाची तीव्रता थोडी कमी असते भाजण्याचे पदार्थ सलग दोन दिवस ठेवा जेवढे ऊन जास्त तेवढे काम जास्त. बराच वेळ ऊन मिळणार असेल तर दुपारी एकदा कुकर वळवून सूर्याची किरणे जास्तीत जास्त वेळ आरशावर पडतील असे(म्हणजेच दक्षिण दिशेला तोंड करून ठेवावे).

पहा घरात लहान मुले असतील तर सोलर कुकर जवळ येणार नाहीत याची दक्षता घ्या यातून काहीही धोका नाही आहे पण काचा फुटण्याची शक्यता असते. जर दगड वगैरे मारला किंवा जोराने त्यावर कुणाचा धक्का लागला तर काच फुटू शकते.

सकाळी बाहेर पडून संध्याकाळीच परत येणार असाल तर साधारण जास्तीत जास्त ऊन मिळेल अशा रीतीने दक्षिण दिशेला तोंड करून हा कुकर ठेवावा आणि पाण्याचे प्रमाण जास्त ठेवावे. यात शक्यतो पदार्थ करपत नाही किंवा ऊतू जात नाही पण जास्त वेळ ठेवल्यास शिजून कोरडा होऊ लागतो. खूप उष्ण प्रदेशात यात दोन वेळचे पदार्थ शिजू शकतात त्यामुळे तुम्ही नवनवीन प्रयोग करू शकता.

काही ठिकाणी कुकर बरोबर पाकक्रिया यांचे पत्रक मिळते तेही उपयोगी पडू शकते. तुम्हाला लागेल येवढ्या क्षमतेचेही कूकर बाजारात उपलब्ध आहेत.

सन्मित्र च्या देखभालीचा खर्च आरसा फुटला तरच करावा लागतो. तर मग मंडळी अंगण गॅलरी टेरेस फार्महाउस जेथे चार सहा तास ऊन येणारी जागा असेल व चुलीवरची चव आवडत असेल आणि अंगी थोडी चिकाटी असेल तर आणा हा मित्र तुमच्याही घरी. अहेना माझा सन्मित्र गुणवान! माझा झाला तसा तो तुमचाही सन्मित्र होईल हेही नक्कीच !

You may also like